पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी येथे आयोजित शालेय जिल्हास्तर व्हॉलीबॉल स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या गटात सिटी प्राईड ज्युनिअर कॉलेज, निगडी संघाने अजिंक्यपद पटकावले आहे. दिनांक २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ही स्पर्धा ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात पार पडत आहे. आज झालेल्या १७ वर्षांखालील मुलांच्या गटात जिल्ह्यातील तब्बल ९४ संघांनी सहभाग नोंदवून चुरशीचा खेळ सादर केला.
उद्घाटन सोहळा आणि मान्यवरांची उपस्थिती
या जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळकृष्ण धुमाळ यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी केंद्राध्यक्ष श्री. मनोज देवळेकर, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी श्री. दीपक कन्हेरे, पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती ज्योतीताई सूर्यवंशी, श्रीमती विद्याताई उदास, श्रीमती संपदाताई कुलकर्णी तसेच क्रीडा पर्यवेक्षक बन्सी आटवे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर क्रीडा स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील एकूण ३०५ शाळांमधील ३,६६० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला असून शालेय स्तरावरील प्रतिभावान खेळाडूंना या स्पर्धेमुळे मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
"विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात मैदानी खेळांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. पिंपरी चिंचवड महापालिका व क्रीडा परिषदेच्या या संयुक्त उपक्रमामुळे ग्रामीण व शहरी भागातील उदयोन्मुख खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची उत्तम संधी मिळाली आहे," असे उद्घाटनाप्रसंगी मान्यवरांनी नमूद केले.
उत्कृष्ट नियोजन आणि प्रशासकीय सहकार्य
या भव्य जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे क्रीडा उपायुक्त श्री. पंकज पाटील आणि प्रशासनाधिकारी श्री. दत्ता सूर्यवंशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक श्री. शंभुराजे मनूर, श्री. सागर देशपांडे, श्री. वाल्मिक पवार, श्री. लक्ष्मण माने, श्री. सुरेश मंजाळ, श्री. धनंजय झिंजुर्डे आणि श्री. विठ्ठल पारखे यांनी विशेष परिश्रम घेतले.
तसेच स्पर्धेदरम्यान खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी आणि सुविधेसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभाग, सुरक्षा विभाग आणि जनसंपर्क विभागाने चोख व्यवस्था ठेवून सहकार्य केले. विजेत्या सिटी प्राईड ज्युनिअर कॉलेजच्या संघास आणि उपविजेत्या ज्ञान प्रबोधिनी संघाचे क्रीडा जगतातून कौतुक होत आहे.
Comments (0)
Leave a Comment
No comments yet. Be the first to comment!