मध्य प्रदेशातून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामार्गे राज्यात घुसवला जाणारा तब्बल १ कोटी १३ लाख ५४ हजार ६०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित पानमसाल्याचा साठा अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) विशेष पथकाने चाकण-तळेगाव चौकात सापळा रचून जप्त केला. शुक्रवारी दुपारी दोन वाजल्यापासून ठाणे आणि पुणे विभागाच्या पथकांनी संगमनेर, मंचर आणि राजगुरुनगर टोलनाका पार करत तब्बल ६ तास संशयित ट्रकचा थरारक पाठलाग केला. राजगुरुनगर टोलनाक्यावर शासकीय वाहन आडवे लावूनही चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मदतीने चाकण औद्योगिक पट्ट्यात ट्रकला चहूबाजूंनी घेरून चालकासह ५ जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑपरेशन ६ तास: समृद्धी महामार्ग ते चाकण-तळेगाव जंक्शन

अन्न व औषध प्रशासनाच्या गुप्तचर विभागाला मध्य प्रदेशातून टाटा ट्रक (क्र. MH 18 BZ 2350) भिवंडी-ठाण्याच्या दिशेने निघाल्याची गुप्त माहिती मिळाली होती. मात्र चालकाने संगमनेरमार्गे पुण्याच्या दिशेने अचानक मार्ग बदलल्याने अधिकाऱ्यांचा संशय बळावला. पुणे विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी लक्ष्मीकांत सावळे यांच्या पथकाने राजगुरुनगर टोलनाक्यावर नाकेबंदी केली असता चालकाने गाडी न थांबवता अंगावर घालून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी रात्री ८ वाजता चाकण-तळेगाव चौकातील ट्रॅफिक जंक्शनवर ट्रकला अडवून चालकाला ताब्यात घेतले.

आंतरराज्यीय रॅकेट उघडकीस आणि 'मकोका'ची शिफारस

चाकण पोलिसांनी हरियाणाचा ट्रकचालक नफीस मेहबूब खान (वय ४०), खामगावचा पुरवठादार निलेश राठी, जळगावचा अरुण पाटील, इंदूरचा ट्रान्सपोर्टर संजय माटा आणि वाहनमालक मे. जे.एम.डी. एंटरप्रायझेस (धुळे) अशा पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ आणि भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील गंभीर कलमांखाली नोंदवण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या कारवाईनंतर कठोर पवित्रा घेतला आहे. हा निव्वळ अन्न भेसळीचा प्रकार नसून आंतरराज्यीय टोळीने चालवलेला संघटित आर्थिक गुन्हेगारी कट असल्याने, आरोपींच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करून त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याचा अधिकृत प्रस्ताव पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांना पाठवण्यात आला आहे.

"सार्वजनिक आरोग्याशी खेळणाऱ्या गुटखा तस्करांना धडा शिकवण्यासाठी आता केवळ सामान्य कलमे पुरेशी नाहीत. या रॅकेटची पाळेमुळे खणून काढण्यासाठी मकोकासारख्या कठोर कायद्याचा वापर केला जाईल," असे FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.

औद्योगिक पट्ट्यातील गोदामे रडारवर

चाकण, तळेगाव, भोसरी आणि हिंजवडी या औद्योगिक भागातील कामगारांना लक्ष्य करून हा गुटखा स्थानिक पानटपऱ्यांवर चढ्या भावाने विकला जाणार होता. हा माल पिंपरी-चिंचवड परिसरातील ज्या गोदामांमध्ये उतरवला जाणार होता, त्या वितरकांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेची दोन विशेष तपास पथके रवाना करण्यात आली आहेत. नागरिकांनी भेसळयुक्त अन्नपदार्थ किंवा अवैध गुटख्याच्या तक्रारीसाठी १८००-२२२-३६५ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.