वारकरी संप्रदायाच्या जागतिक प्रसारासाठी संतांचे वंशज कार्यरत; ‘ग्लोबल वारी’चा इतिहासिक सन्मान सोहळा!

पुणे (प्रतिनिधी): जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि विश्वमाऊली संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पुण्यात आगमन झाले असतानाच मुक्कामाच्या दिवशी, १० जुलै २०२६ रोजी एका ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 'जागतिक वारकरी संप्रदाय संघटना' (यु.एस.ओ. वारकरी) २२-२०२३ पासून कार्यरत आहे. त्यांच्या माध्यमातून समस्त वारकरी फडकरी, गडकरी आणि संस्थानिक यांच्या संयुक्त विद्यमाने ग्लोबल वारीचा सन्मान सोहळा करण्यात आला. या सोहळ्यात वारकरी संप्रदायाचा वैश्विक प्रसार आणि प्रचाराचा संकल्प पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आला.

संत नामदेव महाराजांचे वारसदार

संत नामदेव महाराजांनी सातशे वर्षांपूर्वी आपल्या अभंगवाणीने “ज्ञानदीप लावू जगी” भारतभर वारकरी संप्रदायाची पताका फडकवली आणि आज तीच परंपरा पुढे नेत आज संतांचे वंशज, विविध फड परंपरेतील प्रमुख आणि समस्त वारकरी संप्रदाय एकत्रित येऊन हे इतिहासिक कार्य करत आहेत.

कार्यक्रमाची प्रस्तावना आणि प्रमुख भूमिका जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. अनिकेत म. मोरे देहूकर यांनी मांडली. ते म्हणाले, "पंढरपूर देहू-आळंदीमध्ये होणारे फडावरील शुद्ध भजन ज्या दिवशी लंडन, जर्मनी, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये त्याच गांभीर्याने आणि शुद्ध स्वरूपात होईल, त्याच दिवशी खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाचा जागतिक प्रसार झाला असे आपण म्हणू शकू. त्यामुळे संप्रदायात कोणतीही भेसळ नसणे ही काळाची गरज आहे."

जगद्गुरू तुकोबाराय वंशज

ह.भ.प. श्रीगुरू कान्होबा महाराज देहूकर यांनी वारकरी संप्रदायाच्या रचनेवर भाष्य करताना सांगितले की, "देहूकर आणि वासकर फड हे वारकरी संप्रदायाची दोन प्रमुख चाके आहेत, ज्यांना नामदास फडाच्या परंपरेची भक्कम जोड लाभली आहे.

भजन सम्राटांचे आवाहन

भजन सम्राट ह.भ.प. सोपान महाराज टेंभूकर यांनी भजन परंपरेचे महत्त्व विशद करत जगभरातील इच्छुक वारकऱ्यांनी शुद्ध भजन परंपरा शिकण्याचे आवाहन केले. साखरे महाराज परंपरेतील श्रीगुरू ह.भ.प. चिदंबरेश्वर महाराज साखरे यांनी संतांनी जपलेला वारसा परदेशातही शुद्ध स्वरूपात पोहोचवण्याचे आवाहन केले.

ग्लोबल वारीचे संकल्पक

ग्लोबल वारीचे संकल्पक मा. अनिलजी खेडकर सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना भावूक होऊन म्हणाले की, "या व्यासपीठावर संतांच्या वंशजांसोबत बसण्याची संधी मिळणे हे माझ्यासाठी परम भाग्य आहे. हा मिळालेला मानसन्मानाने माझे जीवन धन्य झाले."

कार्यक्रमाचे अध्यक्ष

वासकर फडाचे प्रमुख ह.भ.प. राणा महाराज वासकर यांनी या सर्वांचे श्रेय पांडुरंग परमात्म्याला आणि ज्ञानोबाराय-तुकोबाराय आदि संतांना दिले. ते म्हणाले, "ही पांडुरंगाची सेवा आहे. भविष्यात आम्ही परदेशातील वारकरी परंपरा जतन करण्यासाठी त्या त्या देशात जाऊन सेवा करणार आहोत."

या भव्य ऐतिहासिक सोहळ्याचे सूत्रसंचालन ह.भ.प. श्रीकृष्ण म. केंद्रे शास्त्री यांनी केले. कार्यक्रमाला असंख्य वारकरी आणि मान्यवर उपस्थित होते.