नागपूर शहराच्या शाश्वत विकासाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी 'अमृत २.०' योजनेअंतर्गत सुरू असलेली विकासकामे आणि पोहरा नदीचे प्रदूषण निर्मूलन व पुनरुज्जीवन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आमदार प्रवीण दटके, स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी-वाखरे यांच्यासह महापालिका आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी अमृत २.० अंतर्गत सुरू असलेली सर्व कामे गुणवत्ता राखून मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे सक्त निर्देश दिले.

रस्ते खोदकाम आणि पुनर्भरणासाठी शास्त्रीय पद्धतीची सक्ती

शहरातील जलवाहिन्या आणि सिव्हरेज लाईनच्या कामांमुळे होणाऱ्या खोदकामावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका घेतली. सिमेंट रस्त्यांचे खोदकाम व त्यानंतरचे पुनर्भरण (Reinstatement) करताना कोणत्याही प्रकारची तडजोड न करता शास्त्रीय व वैज्ञानिक पद्धतीचा (Scientific Method) सक्तीने अवलंब करण्यात यावा, असे निर्देश त्यांनी दिले. भविष्यात मनपा, महावितरण आणि इतर सेवा देणाऱ्या विभागांचे समन्वय राहावे यासाठी एक सर्वसमावेशक व कडक 'रस्ते पुनर्भरण धोरण' तात्काळ तयार करण्याचे आणि कामात दिरंगाई किंवा हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कंत्राटदारांवर थेट दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

पोहरा नदी पुनरुज्जीवन: एसटीपी आणि पंपिंग स्टेशनची उभारणी

पोहरा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचा (STP) सविस्तर आराखडा बैठकीत मांडण्यात आला:

  • जयताळा: १० एमएलडी क्षमतेचा सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट उभारण्यात येणार.
  • चिखली: ३५ एमएलडी क्षमतेचा अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यरत होणार.
  • पंपिंग स्टेशन्स: सांडपाण्याचा योग्य उपसा व वहन करण्यासाठी चिंचभवन, बीडीपेठ आणि सोमलवाडा येथे अत्याधुनिक पंपिंग स्टेशन्स उभारली जाणार आहेत.