पिंपळे गुरव (विशेष प्रतिनिधी): शहरातील सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पिंपळे गुरव परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील रामकृष्ण मंगल कार्यालय ते काटेपुरम चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या मोकळ्या जागेतील एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मानवी पायाचे दोन तुकडे मिळून आल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यालगत पडलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात स्थानिक नागरिकांना मानवी पायासारखे अवयव दिसले. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती सांगवी पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सांगवी पोलिसांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली व पाहणी सुरू केली.

पुरुषाचे अवयव असल्याचा अंदाज

प्राथमिक तपासानुसार हे मानवी अवयव एका पुरुषाच्या देहाचे असल्याचे समजते. मात्र, संबंधित व्यक्ती कोण आहे आणि तिचा खून करून हे अवयव येथे फेकले गेले का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. फॉरेन्सिक टीमच्या मदतीने अवयवांची अधिक तपासणी केली जात आहे.

परिसरात भीतीचे वातावरण

मृतदेहाचे तुकडे सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच पिंपळे गुरव आणि सांगवी परिसरात नागरिकांमध्ये भीती व संशयाचे वातावरण पसरले आहे. सध्या संबंधित मृत व्यक्तीची ओळख पटविणे आणि गुन्ह्याचा छडा लावणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे.