पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर सिद्ध झाली आहे. थेरगाव येथील कै. दत्तोबा रामचंद्र काळे इंग्रजी माध्यम शाळेचा इयत्ता नववीचा विद्यार्थी अरमान अमीन खान याने नवी दिल्ली येथे पार पडलेल्या ७० व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२६–२७ (SGFI) मध्ये रग्बी (१४ वर्षांखालील मुले) क्रीडा प्रकारात कांस्यपदक पटकावले आहे. या दैदीप्यमान कामगिरीबद्दल थेरगाव येथील 'ग' क्षेत्रीय कार्यालयात त्याचा भव्य सत्कार करण्यात आला.

दिल्लीतील त्यागराज स्टेडियमवर चमकदार कामगिरी

नवी दिल्ली येथील त्यागराज स्टेडियमवर पार पडलेल्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत अरमान खान याने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले. देशभरातील विविध राज्यांच्या बलाढ्य संघांविरुद्ध खेळताना अरमानने उत्कृष्ट वेग, कौशल्य आणि सांघिक खेळाचे प्रदर्शन करत कांस्यपदकावर आपले नाव कोरले. महापालिका शाळेतील एका विद्यार्थ्याने मिळवलेल्या या राष्ट्रीय यशामुळे संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराचा गौरव वाढला आहे.

'ग' क्षेत्रीय कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते सत्कार

अरमानच्या या यशाची दखल घेत थेरगाव येथील 'ग' क्षेत्रीय कार्यालयात आयोजित क्षेत्रीय सभेत त्याचा विशेष सन्मान करण्यात आला. 'ग' प्रभागाच्या अध्यक्षा मनीषाताई पवार यांच्या हस्ते अरमानला गौरविण्यात आले. या सत्कार सोहळ्याला नगरसदस्या योगिताताई बारणे, शालिनीताई गुजर, नगरसदस्य तानाजीभाऊ बारणे आणि क्षेत्रीय अधिकारी मुकेश कोळप उपस्थित होते.

शिक्षक आणि क्रीडा मार्गदर्शकांचे मोलाचे योगदान

अरमानच्या या यशामागे शाळेतील शिक्षक आणि क्रीडा मार्गदर्शकांचे विशेष परिश्रम आहेत. त्याला मुख्याध्यापक शुम बॅनर्जी, क्रीडा मार्गदर्शक संतोष मोरे, क्रीडा शिक्षक कृष्णा काकडे, सिद्धी केदारी, हर्षल मुळे तसेच 'ग' प्रभाग क्रीडा पर्यवेक्षक बन्सी आटवे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.