दुर्घटनेला तिसरा दिवस, बचावकार्य सुरूच

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोत बुधवारी घडलेल्या दुर्घटनेला आज तिसरा दिवस असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी बचावकार्य अविरतपणे सुरू आहे. इमारतीचा ढिगारा आणि अस्थिर झालेली संरचना यामुळे हे बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक बनले आहे.

नगरसेवक अभिषेक बारणे यांची घटनास्थळी पाहणी

स्थानिक नगरसेवक अभिषेक बारणे यांनी गुरुवारी घटनास्थळाला भेट देत बचावकार्याचा आढावा घेतला. "मी स्वतः प्रशासनाच्या संपर्कात असून, बचावकार्यासाठी आवश्यक असलेली सर्व मदत आणि यंत्रसामग्री पुरवण्यात कोणतीही कमतरता पडू नये, यासाठी आग्रही आहे," असे बारणे यांनी सांगितले. अडकलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना होत असलेल्या मानसिक त्रासाची जाणीव असल्याचेही त्यांनी नमूद केले. "अडकलेल्या नागरिकांचे कुटुंबीय ज्या मानसिक अवस्थेतून जात आहेत, त्याची आम्हाला जाणीव आहे. आम्ही सर्वजण या संकटाच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत," असे ते म्हणाले.

NDRF, अग्निशमन दल आणि पोलिसांचा समन्वित प्रयत्न

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या तज्ज्ञ पथकासह महानगरपालिकेचे अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन एकत्रितपणे बचावकार्य राबवत आहेत. NDRF चे कमांडंट प्रवीण धट्ट यांनीही घटनास्थळी भेट देत कामाचा आढावा घेतला आहे. इमारतीचा अस्थिर भाग तोडण्यासाठी आणि सुरक्षित मार्ग तयार करण्यासाठी अत्याधुनिक डिमोलिशन एक्सकॅव्हेटर मशिनरींचा वापर वाढवण्यात आला आहे. आतापर्यंत नऊ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असून, एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे.

महापालिका आयुक्त सलग तीन दिवस घटनास्थळी

महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि वरिष्ठ अधिकारी गेल्या तीन दिवसांपासून प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून प्रत्येक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विजयकुमार चौबे हेही बचावकार्याच्या नियोजनात सहभागी आहेत. बचावकार्यासाठी आवश्यक सर्व साधनसामग्री आणि यंत्रसामग्री सुरळीत कार्यरत असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

राज्य सरकारकडूनही तातडीच्या सूचना

या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मदत व पुनर्वसन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक प्रशासनाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून बचाव व मदतकार्य युद्धपातळीवर राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घटनेचा संपूर्ण आढावा घेतला असून, मृतांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती सर्व मदत करण्याचे तसेच मोशी येथील जुन्या कचऱ्याच्या बायोमायनिंग प्रक्रियेला तातडीने गती देण्याचे निर्देश दिले आहेत.

बचावकार्य पूर्ण होईपर्यंत प्रयत्न सुरूच राहणार

प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दोघेही या मोहिमेवर बारकाईने लक्ष ठेवून असून, अडकलेल्या सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर काढेपर्यंत बचावकार्य थांबणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनीही या कठीण प्रसंगी संयम राखत बाधित कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.